Join us
Daily Top 2Weekly Top 5

सॅटीसवर नो फेरीवाला क्षेत्र

By admin | Updated: July 13, 2014 23:23 IST

महापालिका क्षेत्रातील अंदाजे ४५ हजार फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी प्रभाग समितीनिहाय सुरू केलेल्या मोहिमेला फारसे यश लाभले नसून आतापर्यंत केवळ २२१२ फेरीवाल्यांनीच नोंदणी केली

ठाणे : महापालिका क्षेत्रातील अंदाजे ४५ हजार फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी प्रभाग समितीनिहाय सुरू केलेल्या मोहिमेला फारसे यश लाभले नसून आतापर्यंत केवळ २२१२ फेरीवाल्यांनीच नोंदणी केली असल्याची माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली. त्यामुळे आता नोंदणीचा कालावधी ३० जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. यानंतर, ज्या फेरीवाल्यांची नोंदणी नसेल, त्यांना व्यवसाय करता येणार नसून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवाय, कमिटीच्या पुढील बैठकीत ठाणे स्टेशन परिसर म्हणजेच सॅटीस ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.ठाणे महापालिकेने २००९ मध्ये फेरीवाला धोरण हाती घेतले होते. परंतु, काही तांत्रिक बाबींमुळे पुन्हा यात फेरबदल करण्यात येऊन नव्याने हे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार, आता काही महिन्यांपूर्वी मुख्य समितीचे गठन झाल्यानंतर प्रभाग समितीनिहाय फेरीवाला नोंदणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पालिकेने ५० हजार अर्ज छापले आहेत. त्यानुसार, शेवटच्या तारखेपर्यंत ६०५४ अर्ज वितरित झाले असून त्यापैकी २२१२ जणांनी नोंदणी केल्याने पुन्हा याचा कालावधी वाढवण्यात आला असून ३० जुलैपर्यंत जे फेरीवाले नोंदणी करणार नाहीत, त्यांच्यावर पुढील महिन्यापासून कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, या धोरणाची आता अंमलबजावणीस सुरुवात झाली असून रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील आठवड्यात आता कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत ठाणे स्टेशन परिसर म्हणजेच सॅटीस ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निश्चित करण्यात येईल, असेही संकेत दिले आहेत. ठाणे स्टेशन परिसर ना - फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित झाल्यास फेरीवाल्यांना येथे व्यवसाय करता येणार नाही.