Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचे मृत्यू नाहीत, पण अफवा पसरवू नका; समस्या असेल, तर पशुसंवर्धन आयुक्तालयाला माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST

टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कावळे, ठाण्यात बगळे व पोपट या पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे ...

टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कावळे, ठाण्यात बगळे व पोपट या पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आले असले, तरी हे मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरविण्यात येऊ नयेत. समस्या असेल, तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्याची माहिती द्यावी. मुंबईत आतापर्यंत बर्ड फ्लू रोगामुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आलेले नाही, तरीही दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ५ राज्यांतून बर्ड फ्लूने सुमारे २५ हजार देशी विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातही १५ पाणबागळ्यांचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पक्ष्यांना कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, मांजर, कुत्रे, कावळे यांनी या मृतदेहांना तोंडही लावले नाही. त्यामुळे गूढ वाढले आहे. याबाबत मुंबई पशुवैद्यक संस्था अधिक तपास करत आहे. त्यातून जे निष्पन्न होईल, तेव्हा मृत्यूचे खरे कारण उघड होईलच, परंतु निसर्ग अभ्यासक व पक्षीप्रेमी म्हणून आपण पक्षी निरीक्षणासाठी जात असलेल्या जागांवर जर कोणतेही पक्षी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले दिसले, तर त्वरित वनविभागाला कळवा. या पक्ष्यांना न हाताळता सुरक्षित अंतरावरून त्यांचे फोटो काढा. बर्ड फ्लूबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केल्याचे पर्यावरणमित्र रोहित जोशी यांनी सांगितले.

---------------

पशुसंवर्धन विभागाद्वारे घेतली जाणारी काळजी

दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत पक्ष्यांच्या घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने, तसेच रक्तजल नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या ५ राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात.

---------------

परस्पर विल्हेवाट लावू नये

पोल्ट्रीधारक, सर्वसामान्य जनता यांना कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास, व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास, पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. मृत पक्ष्यांना हात लावू नये, शवविच्छेदन करू नये, त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

निर्बंध लागू नाहीत

बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत आहे. पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने, अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. सध्या चिकन व अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.

---------------

घाबरण्याची परिस्थिती नाही

स्थलांतरित होणाऱ्या जंगली पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये, व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लूचे सर्वेक्षण राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप वन्य व स्थलांतरित पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आलेला नाही. यामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आलेले नाही. घाबरण्याची परिस्थिती नाही.

---------------