पंकज पाटील, अंबरनाथवालधुनी नदीच्या किनाऱ्यांवर असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांमधील केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याने त्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याकडे अधिकारीवर्ग सोयीने दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात अंबरनाथ गावचे रहिवासी राकेश पाटील यांनी पुन्हा पालिकेकडे दाद मागितली आहे. उल्हासनगरमध्ये जीन्स बनवण्याचे अनेक कारखाने असून या जीन्सला रंग देण्यासाठी वालधुनी नदीकाठीच अनेक वॉश कारखाने उभारले आहेत. या कारखान्यांत रंग देण्यासाठी विषारी केमिकल्स वापरले जातात. तसेच काम झाल्यावर हे विषारी केमिकलयुक्त पाणी थेट वालधुनी नदीत सोडले जाते. अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या सीमेवर हे कारखाने असून त्यात बहुसंख्य कारखाने आकाशनगर, धर्मात्मा कॉलनी, शिव कॉलनी, गायकवाडपाडा, दुर्गापाडा, खांबदेवपाडा आदी भागांत आहेत. जीन्स वॉशनंतर कंपनीतील हे विषारी पाणी थेट नदीत जात असल्याने प्रदूषण वाढले आहे. तसेच या नदीपात्राला लागून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून त्याच भागात चार शाळाही आहेत. या दूषित पाण्याचा त्या लोकवस्तीवर किंवा शाळेतील विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सुधारावी म्हणून बेकायदेशीररीत्या सुरू असलेले सर्व कारखाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वीच दिले होते. तसेच या कारखान्यांची वीज, पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, वीज वितरण विभाग आणि महापालिकेने अजूनही कारवाई केली नाही. या कारखान्यांवर कारवाई करण्यास अधिकारी चालढकल करत असल्याने यासंदर्भात मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी पुढाकार घेत पुन्हा यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच या कारखान्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी महापालिकेवर अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जीन्स कारखान्यांवर कारवाई नाही
By admin | Updated: September 26, 2014 00:53 IST