मुंबई: फसवणूक करून प्रवेश घेतल्याचा आरोप असलेल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज् (एनएमआयएमएस) विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाने गुरुवारी अंशत: दिलासा दिला आहे. एनएमआयएमएसने त्याची पदवी रद्द केली होती. मात्र, न्यायालयाने संस्थेला विद्यार्थ्यांची बाजू ऐक्ल्यानंतर अंतिम निर्णय घेण्याचा आदेश दिला.एनएमआयएमएसने ३० जून २०१३ रोजी विद्यार्थ्याची पदवी रद्द केली. न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने संस्थेने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन केल्याचे म्हणत संस्थेचा निर्णय रद्द केला. चौकशी करा आणि संबंधित विद्यार्थ्याची बाजू ऐकून वेळेत निर्णय घ्या, असा आदेश न्यायालयाने दिला. एनएमआयएमएसच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांच्या मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोव्हेंबर- २०१० मध्ये इंदूर येथे एनएमएटी परीक्षा होती. याचिकाकर्त्याने परीक्षेला डमी बसवून संस्थेत प्रवेश घेतला. त्यामुळे त्याला देण्यात आलेली पदवी रद्द करण्यात आली आहे.तर, याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, संस्थेने त्याचे दोन वर्षांचे गुण पाहाणे गरजेचे आहे. या दोन्ही वर्षी तो गुणवत्ता यादीत आला होता. त्यामुळे त्याला प्रवेश घेण्यासाठी डमीची गरज नाही.
‘एनएमआयएमएस’च्या विद्यार्थ्याला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:04 IST