Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, जि.प.प्राथमिक शाळांची दुरवस्था !

By admin | Updated: June 18, 2015 00:35 IST

महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसून विजेचे बिल न भरल्याने अनेक शाळांचा विद्युतपुरवठा

ठाणे : महापालिकांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसून विजेचे बिल न भरल्याने अनेक शाळांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याचे प्रवेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या निदर्शनास आले. शाळांची या दुरवस्थेकडे वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून मोते यांनी ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या असता त्यांनाही दुरावस्था पहायला मिळाली. सर्व शिक्षा अभियानातून गणवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ४०० रुपये मिळणे अपेक्षीत आहे. पण त्यांच्या हाती फक्त १२० रुपये टेकविल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. तर भिवंडी महानगरपालिकेच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अद्याप कोणतेही अनुदान मिळाले नाही. यामुळे गोरगरीब मुलांची अक्षरश: थट्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कल्याण तालुक्यातील गोवेली येथील प्राथमिक शाळांच्या विजेच्या बीलाची रक्कम थकित आहे. यामुळे कनेक्शन तोडण्यात आले आहे. या कारणास्तव सुमारे दोन वर्षांपासून शाळेत लाईट , पंखे चालू नाहीत, संगणक एलसीडी प्रोजेक्टर धूळ खात पडले आहेत. शेकडो शाळा डिजीटल करण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शाळांमध्ये वीज पुरवठा नाही. ठाणे जिल्हा परिषदेचा हजगर्जीपणा याला कारणीभूत ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी या दुरावस्थेत तातडीने लक्ष घालावे यासाठी तक्रार करण्यात येणार असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)