घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयात गोल वर्तुळाकार जागेत उभ्या राहणाऱ्या रिकामटेकड्यांना सुरक्षारक्षक आता उभे राहू देणार नाहीत. कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांना पालिकेत प्रवेश घेताना ही खबरदारी घेऊनच पालिकेत प्रवेश करावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवरील गोलाकृती जागेत सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच असे आदेश दिले असल्याचे हे सुरक्षारक्षक सांगतात. यासाठी जुन्या जकात कार्यालयाकडील प्रवेशद्वाराला टाळे लावले आहे. विशेष म्हणजे जिथे धोका आहे, त्या चौथ्या मजल्यावर हे सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत.पालिकेत विविध कामांसाठी असंख्य नागरिक रोज फेऱ्या मारत असतात. याव्यतिरिक्त ठेकेदार, नगरसेवक यांचीदेखील वर्दळ असते. अनेक वेळा प्रत्येक मजल्यावर ये-जा करताना ओळखीचे कोणी भेटले तर त्या गोल वर्तुळाच्या जागेत उभे राहून चर्चेचा फड रंगत असतो. हा मोह अधिकाऱ्यांसह कोणाला टाळता येत नसल्याचे दृष्टीस पडत असते. तसेच त्या गोल वर्तुळाच्या जागेत उभे राहून खालपासून वरपर्यंत नजरेचा खेळ सुरू असतो. त्या वेळी कोण कुठल्या मजल्यावरून येत आहे, ते नजरेस पडत असल्याने त्या व्यक्तीला तत्काळ गाठता येते व त्यांचा मजले चढण्याचा त्रास कमी होतो. हा रोजचा अनुभव आहे. यात अनेक रिकामटेकडेही असल्याने त्यांना आता आळा बसणार आहे. (वार्ताहर)
मनपा मुख्यालयातील रिकामटेकड्यांना सुरक्षारक्षक हुसकावणार
By admin | Updated: July 3, 2015 22:36 IST