Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे अद्याप राजकारणात लहानच

By admin | Updated: November 7, 2015 22:41 IST

हक्कभंग आणाच : दीपक केसरकरांचा टोला

सावंतवाडी : आमदार नीतेश राणे यांनी प्रथम प्रशासनाचा अभ्यास करावा आणि नंतरच माझ्यावर हक्कभंग आणण्याची स्वप्ने बघावित. अजून ते राजकारणात लहान आहेत. मी आणलेला निधी हा मार्च २०१६ पर्यंत खर्च करायचा असल्याचे सांगत आरोपांना उत्तर देण्यापेक्षा काम करायला मला आवडते, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. ते सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यमंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर अनेक योजनांच्या माध्यमातून निधी येत आहे. तो निधी कसा आला याची माहिती मी अनेक वेळा दिली असून त्याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा. हा निधी बांधकाम तसेच आरोग्य, महामार्ग विभाग आदीच्या माध्यमातून आला आहे. त्याची माहिती त्यांनी घ्यावी, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.नीतेश राणे हे नुकतेच आमदार झाले असून अद्याप आमदारकीचे वय त्यांचे कमी आहे. हक्कभंग कशासाठी आणावा आणि कशासाठी आणू नये, याचा त्यांनी प्रथम अभ्यास करणे गरजेचे असून, एखाद्या कामाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी आरोप करावेत. कामाची माहिती नसेल, तर त्याला आरोप करून काय फायदा आहे, असे सांगत त्यांनी जरूर हक्कभंग आणावा, असे आव्हानही दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मायक्रो प्लॅनिंगमधून पुढे जाणार असून, त्या माध्यमातूनही विकास निधी जिल्ह्याला मिळणार आहे. मार्चपर्यंत सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)