मुंबई : फेरीवाल्यांचे प्रश्न आपण म्हणतो त्या पद्धतीने सोडविले जात नसतील तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करा, असे आवाहन करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांनी आज नाव न घेता कानपिचक्या दिल्या. कामत यांनी म्हटले आहे, की अशा भूमिकेचा आपण निषेध करतो. महापालिका अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने धमक्या देणे हे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. कायदा हातात घेण्याची कोणतीही भाषा काँग्रेसला कधीही मान्य नाही. मुंबईत अनेक वर्षे दादागिरीचे राजकारण करणाऱ्या आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्यांची री काँग्रेसजनांनी ओढू नये. काँग्रेसला १३० वर्षांची सेवा आणि त्यागाची परंपरा आहे आणि अशा धमक्या त्यात मुळीच बसत नाहीत, असे कामत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
निरुपम यांना गुरुदास कामतांच्या कानपिचक्या
By admin | Updated: July 18, 2015 01:34 IST