Join us

ठाणे मनपाचे नऊ प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध

By admin | Updated: April 27, 2015 22:38 IST

ठाणे महापालिकेच्या दहा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या दहा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. त्यातील ९ प्रभाग समित्यांध्ये केवळ प्रत्येकी एक - एक अर्ज आल्याने या ठिकाणच्या निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु मुंब्य्रात कॉंग्रेसच्या दोन नगरसेविका एकमेकासमोर उभ्या आहेत. तर गेल्या वर्षी सेनेकडे असलेल्या कोपरी प्रभाग समितीत शिवसेनेने यंदा राष्ट्रवादीसमोर उमेदवारच दिला नसल्याने ही समिती राष्ट्रवादीकडे गेली आहे. एकूणच महायुतीचे प्रभाग समितीवरील संख्याबळ एकने कमी झाले असून त्यांच्याकडे सात तर विरोधीपक्षाकडे ३ प्रभाग समित्या जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यातही प्रभाग समित्यांवर महिलांचा वरचष्मा आहे तब्बल आठ प्रभाग समिती अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे.ठाणे महापालिकेच्या १० प्रभाग समित्यांच्या सभापतीपदांची निवड मंगळवारी होणार आहे. त्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानुसार मानपाडा - माजिवडा प्रभागसमितीत शिवसेनेकडून स्नेहा पाटील, वर्तक नगर मधून भाजपाच्या आशादेवी शेरबहादुरसिंह, लोकमान्य सावरकर नगर मधून शिवसेनेच्या कांचन चिंदरकर, रायलादेवी येथून महायुतीला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आशा कांबळे, वागळे इस्टेट संध्या मोरे शिवसेना, उथळसर महेश्वरी तरे शिवसेना, नौपाडा हिराकांत फर्डे शिवसेना, कोपरी भरत चव्हाण राष्ट्रवादी, कळवा मनाली पाटील राष्ट्रवादी आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. याठिकाणी एक - एकच अर्ज आल्याने येथील प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध मानली जात आहे. तर मुंब्य्रात मात्र कॉंग्रेसच्याच दोन नगरसेविकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात अन्सारी साजीया परवीन सर्फराज आणि कुरेशी साजीया आई या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणचीच निवडणूक शिल्लक राहिली आहे. आता यातील कोण माघार घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी दहा प्रभाग समित्यांपैकी केवळ दोन प्रभाग समित्या लोकशाही आघाडीकडे होत्या. यंदा मात्र कोपरी प्रभाग समिती शिवसेनेने राष्ट्रवादीला बहाल केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या भरत चव्हाण यांचा एकमेव अर्ज येथे दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे. (प्रतिनिधी)४ठाणे मनपाच्या १० प्रभाग समिती सभापतीपदांची निवड मंगळवारी होणार आहे. त्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. गेल्या वर्षी दहा प्रभाग समित्यांपैकी केवळ दोन समित्या लोकशाही आघाडीकडे होत्या.