Join us
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना पॉझिटिव्हिटी दर अधिक असलेले नऊ जिल्हे प्रशासनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

विशेष लक्ष देणार; आराेग्य विभागाने हाती घेतला त्रिसूत्री कृती कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू ...

विशेष लक्ष देणार; आराेग्य विभागाने हाती घेतला त्रिसूत्री कृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यामुळे रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही राज्यातील नऊ जिल्ह्यांत अधिक असणाऱ्या पॉझिटिव्हिटी दराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या जिल्ह्यांत विशेष लक्ष देऊन काम करण्याचे नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

याविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत माहिती देताना टास्क फोर्समधील सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात पुन्हा रुग्णवाढ होऊ नये याकरिता आरोग्य विभाग आणि अन्य यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती, अकोला, नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. हा दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्याअंतर्गत सहवासितांचा शोध, निदान व चाचणी या माध्यमातून काम करण्यात येत आहे. तसेच कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती, प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया हाताळण्यात येत आहेत.

* मास्कचा वापर बंधनकारक

नागपूर, सातारा आणि नाशिक येथे अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सामान्य नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत बेफिकीर राहून चालणार नाही, त्याकरिता या वर्षअखेरपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सामान्यांनीही कोरोना नियंत्रणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

............................