Join us

इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 30, 2015 04:39 IST

डोंबिवलीनजीक ठाकुर्ली येथे मंगळवारी रात्री कोसळलेल्या मातृकृपा बिल्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊवर पोहोचली असून, आतापर्यंत ११ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.

कल्याण : डोंबिवलीनजीक ठाकुर्ली येथे मंगळवारी रात्री कोसळलेल्या मातृकृपा बिल्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊवर पोहोचली असून, आतापर्यंत ११ जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर महापालिकेच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ठाकुर्लीतील मीरा नगर परिसरातील ही ४३ वर्षे जुनी इमारत तळमजला अधिक दोन मजल्यांची होती. तिला धोकादायक म्हणून महापालिकेने जाहीर केले होते; तरीही या इमारतीत २० कुटुंबे राहत होती. यातील १२ कुटुंबांची घरे असलेला भाग मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळला. भाग कोसळत असल्याची जाणीव होताच काही कुटुंबे इमारतीबाहेर धावली. तरीही सात कुटुंबे गाडली गेली. इमारतीचा क्षणात ढिगारा झाल्यानंतर परिसरात हाहाकार उडाला. त्यातच विद्युतपुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते.