Join us  

पाच वर्षांत भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणावर नऊ कोटी रुपये खर्च, समस्या मात्र कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:47 PM

सध्या मुंबईत असलेल्या भटक्या श्वानांची संख्या तब्बल दोन लाख ६४ हजार ६१९ एवढी आहे. 

मुंबई - मागील सात वर्षांच्या कालावधीत पालिकेने नियुक्त केलेल्या अशासकीय संस्थामार्फत एक लाख २२ हजार ६४७ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार भटक्या श्वानांची संख्या ९५ हजार १७२ होती. या कालावधीत नऊ कोटी रुपये खर्च करुन भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. मात्र, सध्या मुंबईत असलेल्या भटक्या श्वानांची संख्या तब्बल दोन लाख ६४ हजार ६१९ एवढी आहे. 

भटक्या श्वानांच्या समस्येबाबत शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी, पालिका कायदा व नियम ६६ ( क) अनव्ये प्रशासनाकडे प्रश्न पाठवले होते. भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी भटक्या जनावरांप्रमाणे भटक्या श्वानांना पकडून कोंडवाड्यात ठेवावे. त्या श्वानांना प्राणी मित्रांना सांभाळण्यासाठी दत्तक तत्त्वावर द्यावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेवर प्रशासनाने माहिती दिली आहे.     त्यानुसार पालिकेने २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार भटक्या श्वानांची संख्या ९५ हजार १७२ होती. तर सध्या मुंबईतील श्वानांची संख्या अंदाजे दोन लाख ६४ हजार ६१९ वर गेली आहे. २०१४ पासून आतापर्यंत अशासकीय संस्थांच्या माध्यमातून एक लाख २२ हजार ६४७ श्वानांचे निर्बिजीकरण केले आहे. गेल्या २०१७ ते २०२१ या कालावधीत निर्बिजीकरणावर तब्बल नऊ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 

  • भटक्या श्वानांना पकडण्यासाठी ११ वाहने उपलब्ध आहेत. भटक्या श्वानांना पकडण्यासाठी आठ - कनिष्ठ अवेक्षक, सहा दुय्यम निरीक्षक व २४ श्वान पारधी अशी ३८ कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे. 
  • सहा अशासकीय संस्थांमार्फत भटक्या श्वानांना पकडून निर्बिजीकरण करण्यात येते. एका श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ७२८ रुपये खर्च होत आहे. 
टॅग्स :मुंबई महानगरपालिका