मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर नावाच्या चक्रीवादळाची तीव्रता आता पहिल्यापेक्षा कमी झाली असून, ते मुंबईपासून दूरवर गेले आहे. मात्र चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणासह पडलेल्या थंडीने काढता पाय घेतल्याने मुंबईचे कमाल तापमान पुन्हा एकदा 35 अंशावर पोहोचले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर असलेल्या निलोफर या अतितीव्र चक्रीवादळाची तीव्रता बुधवारी मध्यरात्री 2.3क् वाजता कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले. ते ईशान्येकडून सरकले असून, बुधवारी सकाळी 8.3क् वाजता ते मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर आहे. त्याचा केंद्रबिंदू नलियापासून (गुजरात) पश्चिम-नैर्ऋत्य दिशेस 62क् कि.मी. आणि कराचीपासून (पाकिस्तान) दक्षिण-नैर्ऋत्य दिशेस 65क् कि.मी. अंतरावर आहे. ते ईशान्येकडे सरकत असून, 31 ऑक्टोबरच्या सायंकाळर्पयत त्याची तीव्रता आणखी कमी होईल.
दरम्यान, विदर्भात काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाडय़ातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)