कल्याण : विकासाचे स्वप्न घेऊन परिवर्तनाची हाक देणा-या १४२- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निलेश शिंदे यांनी गुरुवारी कल्याण पूर्व विभागातून काढलेल्या परिवर्तन रोड शोतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल आणि फटाक्यांच्या आतषबाजीत राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहात मतदारांना विजयाची साद घातली.प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात १४२- कल्याण पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश शिवाजी शिंदे यांनी हजारो कार्यकर्त्यांसमवेत परिवर्तन रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शनातून विरोधकांची हवाच काढली. या रोड शोमध्ये युवा कार्यकर्त्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्गाचा लक्षणीय सहभाग होता. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, गोपाळ मैदान येथून रोड शो ला सुरुवात झाली. येथून सुरू झालेला रोड शो पुढे तिसगाव नाका, म्हसोबा चौक, रमाबाई आंबेडकर चौक, गणपती मंदिर, काटेमानिवली चौक, चिंचपाडा, आमराई, विजयनगर, शिवाजी कॉलनी येथून सायंकाळी ८ वाजता पोटे मैदान या ठिकाणी समाप्त झाला. दरम्यान, या रोड शोमध्ये आमदार जगन्नाथ ऊर्फ आप्पा शिंदे, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, नगरसेविका माधुरी काळे, नगरसेवक जनार्दन म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष प्रशांत काळे, देवबा सूर्यवंशी, काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक बाळाराम गवळी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
रोड शो मधून निलेश शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: October 10, 2014 23:43 IST