Join us  

निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारावर आक्षेपार्ह टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 11:26 AM

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला होता

मुंबई - भाजपा नेते खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. शिवसेना आणि राणे कुटुंब एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. निलेश राणेंनी ट्विटरवर विनायक राऊतांचा फोटो शेअर करत आक्षेपार्ह टीका केली आहे. 

निलेश राणे यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये काही लोक शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पकडल्याचं दिसून येतं. यामध्ये निलेश राणेंनी कॅप्शन देत म्हटलंय की, आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला. निलेश राणे यांनी राजकीय टीका करताना अनेकदा समोरील नेत्यांबाबत आरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पाहायला मिळाले आहे. 

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. शिवसेना आमदारांनी हॉटेल रिट्रीटमध्ये ५ दिवस राहून मोठं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं.मात्र काँग्रेस बोलवेल तेव्हा गुपचूप परत यायचं. कारण मातोश्री आता १० जनपथ दिल्लीला शिफ्ट झाली असून परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला होता.

दरम्यान, रविवारी सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी सरकारवर टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. हे सरकार स्थगिती सरकार आहे, असेही राणे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे. यावेळी गेल्या काही दिवसांत सरकारने विविध विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरूनही  नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली होती.  

 

टॅग्स :निलेश राणे विनायक राऊत शिवसेना