Join us  

संजय राऊतांसारखी लोक 'पेंग्विन’चा राहुल गांधी करणार- निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 2:21 PM

माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शेलक्या शब्दांत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आदित्य यांनी नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली होती. तोच धागा पकडत आता माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शेलक्या शब्दांत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंबरोबर टीका करता करता त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. संज्यासारखी लोक पेंग्विनचा पण राहुल गांधी करणार, देव करो आणि असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात शिवसेनेला आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश आलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 18 जागा जिंकण्यात यश आलं आहे. काही ठिकाणी शिवसेनेने रणनीती बदलत प्रस्थापितांना नाकारून नवीन चेहरे दिले असते तर कदाचित शिवसेनेच्या खासदारांचा आकडा वाढला असता असं चित्र होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला.ठाकरे घराण्यात बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक न लढण्याची परंपरा राखली होती. निवडणूक न लढता बाळासाहेबांनी अनेकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभा सभापती केले मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या हाती असायचा. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राज निवडणूक लढणार यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र राज यांनी युटर्न घेत निवडणूक लढवली नाही. त्यामुळे युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते असलेले आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल. 

टॅग्स :निलेश राणे