Join us

समुद्राच्या लाटांनी उसळलेली वैऱ्याची रात्र!

By admin | Updated: May 7, 2015 04:26 IST

सलमानच्या घरासमोर नेहमीच चाहत्यांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक जण त्याची एक झलक बघण्यास आतुर असतो. या वेळी मात्र चित्र काही वेगळेच होते.

सलमानच्या घरासमोर नेहमीच चाहत्यांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक जण त्याची एक झलक बघण्यास आतुर असतो. या वेळी मात्र चित्र काही वेगळेच होते. चाहत्यांची गर्दीही नेहमीप्रमाणे नव्हती आणि जे होते त्यांच्या चेहऱ्यावर औदासिन्याची छाया होती. बंगल्यात जाणाऱ्या प्रत्येक कारसोबत त्यांची उत्सुकताही वाढत होती. सलमान स्वत: ‘बजरंगी भाईजान’चे चित्रीकरण आटोपून काश्मिरातून सायंकाळीच घरी पोहोचला होता. रात्री सलमानसोबत अनेक चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्यांच्या पाठोपाठ साजिद नाडियादवालाही पोहोचले. साजिद सलमानच्या घनिष्ठ मित्रांपैकी आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर उगवती सकाळ किती तणावपूर्ण राहणार आहे हे स्पष्ट दिसत होते. त्यातच सलमानची आई सलमा यांची प्रकृती चांगली नसल्याचे संकेत प्राप्त झाले. त्यांना मधुमेह असून रक्तदाब लवकर वाढतो. आपल्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेने आई अस्वस्थ झाली होती. संपूर्ण घरच बेचैन होते. सलमानचे वडील सलीम खान एकदोनदा बंगल्याच्या बाल्कनीत दृष्टीस पडले. ते कुणाशी तरी मोबाइलवर बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पत्नीची प्रकृती आणि मुलाची चिंता स्पष्ट जाणवत होती. दरम्यान, बंगल्याच्या दरवाजावर माध्यमांचे कॅमेरे चमकायला लागले होते. तर सुरक्षारक्षक माध्यमांचे कॅमेरे जास्तीत जास्त दूर कसे पाठविता येतील याच्या प्रयत्नात होते. त्यांना काही प्रमाणात यात यशही आले. जवळपास २० मिनिटांनी डेव्हिड धवन यांची कार दरवाजातून बाहेर पडली. बॉलीवूडशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचे आत जाणे सुरूच होते. हे बहुधा वकील असावेत असा अंदाज बांधण्यात येत होता. त्यातच सोहेल खान एकदा अत्यंत घाबरलेल्या स्थितीत वेगाने बाहेर आला आणि तेवढ्याच वेगाने आतही गेला. दुसऱ्यांदा बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्री होता. अरबाज खानही बाल्कनीत आला. तो आपल्या मुलासोबत बोलत होता. दरवाजावर पुन्हा थोडी चहेलपहेल झाली. फराहा खानची कार आत गेली आहे, असे कळले. सोबत त्यांचे पती शिरीष कुंदरही होते. हे दाम्पत्य लवकरच बाहेरही पडले. दरवाजासमोरील गर्दी हळूहळू वाढत चालली होती. या गर्दीत तरुण चेहरे अधिक होते. त्यांच्यासाठी सलमान भावापेक्षा कमी नाही. त्यांची अस्वस्थता आणि चर्चेतून खूप काही कळत होते. एक म्हणत होता, ‘कोर्ट भाईला सोडेल.’ परंतु दुसऱ्याला ते मान्य नव्हते. न्यायालयाचे प्रकरण आहे, काही सांगता येत नाही, अशी भीती त्याला होती. एकाने भाईसाठी नमाजाच्या वेळी आशीर्वाद मागितले होते आणि दुसऱ्यालाही तो यासाठी विनंती करीत होता. नंतर उद्या न्यायालयात जायचे, असा निश्चिय करून दोघे तेथून निघून गेले. रात्रीच्या काळोखासोबतच वातावरणातील शांतताही वाढत होती आणि खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा ही शांतता भंग करीत होत्या. रात्री दीड वाजता शाहरूख खानच्या गाड्यांचा ताफा बंगल्यासमोर थांबला. नेहमी हात उंचावून चाहत्यांना अभिवादन करणारा किंग खान थेट आत निघून गेला होता. शाहरूखच्या आगमनासोबतच जमलेल्या गर्दीत सलमान व शाहरूखची मैत्री व शत्रुत्वाच्या किश्श्यांचे चर्वण सुरू झाले. शाहरूख खान बराच वेळ आत होता. बाहेर निघाला तेव्हा सोहेल खान त्याला सोडायला आला. वृद्ध महिलेची नजर आणि सलमानचाहत्यांच्या या गर्दीत काही अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेची नजर सतत दरवाजावर खिळून होती. तिचे डोेळेसलमानच्या चिंतेने कासावीस झाले होते. कुणी तरी विचारले तेव्हा सलमानने तिच्या कुटुंबाची कशी मदत केली याचे वर्णन तिने केले. मुलाला नोकरीला लावले, आजारी पतीचे उपचार केले. एकाने या वृद्ध महिलेस ती कुठे राहते, असे विचारले तेव्हा ती म्हणाली, पहिले मी फुटपाथवर राहत होती. माझी झोपडी तुटली होती. सलमानने मदत केल्यामुळे दुसरीकडे खोली घेता आली. फुटपाथवर राहणारी एक महिला सलमानसाठी एवढी अस्वस्थ होत होती आणि फुटपाथवर झोपणाऱ्यांना कारने चिरडल्याच्या आरोपातच कारागृहात जाण्याची वेळ त्याच्यावर आली होती, हा किती मोठा अंतर्विरोध होता.