उरण : जेएनपीटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० मीटर लांबीच्या डीपी वर्ल्ड बंदराच्या जेट्टीमुळे न्हावा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या न्हावा ग्रामस्थांनी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि न्हावा ग्रामपंचायत सरपंच जागृती सुनील ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको केला. करळ फाटा आणि जेएनपीटी प्रशासन भवनसमोर केलेल्या आंदोलनामुळे जेएनपीटी प्रशासनाने प्रकल्पातील ५० बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आणि अन्य मागण्यांबाबत फेरचर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.जेएनपीटीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० मीटर लांबीच्या डीपी वर्ल्ड बंदरामुळे न्हावा खाडीचे मुख जवळपास बंदच झाले आहे. या खाडीतूनच न्हावा, न्हावा खाडी, गव्हाण या गावातील मच्छिमार बोटी ये-जा करीत होत्या. तसेच या खाडीतूनच घारापुरी न्हावा येथील नागरिक बाजारहाट करण्यासाठी ये-जा करीत होते. मात्र जेएनपीटी बंदर उभारून खासगी डीपी वर्ल्ड कंपनीला भाड्याने दिलेल्या बंदराचा विस्तारीकरणाचे काम सुरू केल्याने खाडीचे मुखही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या खाडीतून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमार बोटींना मोठा अडसर निर्माण झाला आहे. घारापुरी-न्हावा या सागरी मार्गावरील नागरिकांचे दळणवळणही ठप्प होत चालले आहे. परिणामी मच्छिमारांवर उपासमारीचे संकट येवून ठेपले आहे. मच्छिमारांची उपासमारी थांबविण्यासाठी परिसरातील स्थानिकांना नोकऱ्यात प्राधान्य देण्यात यावे. मच्छिमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, मच्छिमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा आणि न्हावा-घारापुरी रहिवाशांच्या दळणवळणासाठी पर्यायी जेट्टी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सातत्याने जेएनपीटीकडे चालविली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी न्हावा ग्रामस्थांनी करळ फाटा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात शिवसेना आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख दिनेश पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते शाम म्हात्रे, महेंद्र घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आणि सुमारे १५०० प्रकल्पग्रस्त नागरिक सहभागी झाले होते.च्प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीटी प्रशासन भवनलाही धडक दिल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने चर्चा करण्याचा निर्णय घेतला.च्वरिष्ठ प्रबंधक शिबैन कौल यांनी शिष्टमंडळाला याबाबत माहिती दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला.च्आंदोलनात ५०० प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
न्हावा ग्रामस्थांचा जेएनपीटी विरोधात रास्ता रोको
By admin | Updated: December 29, 2014 22:45 IST