Join us

प्रशांत दामलेंच्या वयाच्या ‘साठी’ची पुढची गोष्ट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST

राज चिंचणकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी रंगभूमीवर आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित करणारे व ‘चॉकलेट हिरो’च्या व्याख्येत चपखल ...

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीवर आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित करणारे व ‘चॉकलेट हिरो’च्या व्याख्येत चपखल बसणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या समाजमाध्यमांवरील एका पोस्टने रसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टमुळे, त्यांनी वयाची ‘साठी’ गाठल्याचे रसिकांसमोर उघड झाले आहे.

रंगभूमीवर अजून ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ रंगवून सांगणारा हा कलावंत ‘साठी’चा कधी झाला, असा प्रश्न सध्या रसिकांना पडला आहे.

विशेष म्हणजे, प्रशांत दामले यांच्या वयाची पोलखोल होण्यामागे चक्क कोरोनाची लस निमित्तमात्र ठरली. प्रशांत दामले यांनी अलीकडेच कोरोना लसीचा डोस घेतला आणि त्याचे प्रमाणपत्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले. या प्रमाणपत्रावर त्यांचे वय ६० असे नोंदवले आहे. पण ते पाहून अनेकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.

नव्या पिढीतील तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा वापरत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारे प्रशांत दामले यांनी ‘साठी’ला गवसणी घातल्याचे पाहून, अनेकांना तर प्रमाणपत्रावर ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाली की काय, असा प्रश्‍न नक्कीच पडला असणार. काही रसिकांनी तर दामले यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना; तुम्हाला लस कशी मिळाली, तुमचे वय ४५ तरी आहे का; असा प्रश्न विचारला आहे. कुठल्याही अँगलने तुमची ‘साठी’ झाल्याचे वाटत नाही, अशा आशयाचे प्रशस्तीपत्रकही काहीजणांनी त्यांना दिले.

* सकारात्मक शब्दांची पेरणी...

प्रशांत दामले यांनी सदर पोस्ट लिहिताना, काळजी घ्या आणि नवीन काय करता येईल याचा विचार करा किंवा आता आपण जे करत आहोत; ते अजून छान कसे करता येईल याचा विचार करा, असा संदेश दिला आहे. मी पण तेच करतोय, मागच्या सुट्टीत आवडलेल्या काही संहिता बाजूला काढून ठेवल्या होत्या; त्या आता परत नव्याने वाचत आहे. स्वतःला बिझी ठेवा. अरे, हाय काय नि नाय काय; अशी सकारात्मक शब्दांची पेरणीही प्रशांत दामले यांनी या पोस्टमध्ये केली आहे.

...........................