परिवहन मंत्र्यांचा निर्णय : शेअर टॅक्सीतील लगट थांबणारगौरीशंकर घाळे - मुंबई शेअर टॅक्सीतील पुढील सीट आणि एसटी बसगाड्यांतील मागची सीट महिलांसाठी राखीव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांशी होणारी लगट आणि धक्काबुक्की टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. मुंबई परिसरात सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट, एनएमटी बसेस आणि टॅक्सीचा वापर होतो. बेस्ट आणि एनएमटी बसेसमध्ये महिलांसाठी राखीव सीट्स असतात. टॅक्सीत मात्र अशी कोणतीच सोय नाही. मुंबईत ठिकठिकाणी प्रवासासाठी चार आसनी व सहा आसनी शेअर टॅक्सींचा वापर केला जातो. त्यामुळेच शेअर टॅक्सीतील पुढील सीट महिलांसाठी राखीव करण्याचा निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. महिलांची कुचंबणा आता होणार नाहीशेअर टॅक्सीमध्ये सामान्यत: रांगेप्रमाणे बसायची संधी मिळते. अशावेळी सहप्रवासी पुरुष असल्यास महिलांची स्थिती अवघडल्यासारखी होते. काहीजण तर याच परिस्थितीचा फायदा घेत लगट करण्याचा प्रयत्न करतात. प्रवासादरम्यान होणारी महिलांची कुचंबणा थांबविण्यासाठी त्यांच्यासाठी पुढच्या बाजूस ड्रायव्हरशेजारील जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. ग्रामीण भागात चालणाऱ्या एसटी बसमधील मागील संपूर्ण सीट १० ते १४ वर्षांतील मुलींसाठी राखीव करण्यात आली आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या या गाड्यांमध्ये केवळ मागच्या बाजूस दरवाजा असतो. त्यामुळे अनेकदा शाळा व अन्य कारणांसाठी ये-जा करताना मुलींना वाट काढतच पुढे सरकावे लागते. गर्दीच्या वेळी जागा शोधत पुढे जायचे आणि उतरताना पुन्हा माग काढत येण्याची कसरत करावी लागते. मागील सीटच राखीव केल्याने शाळकरी मुलींची गर्दीतून सुटका होणार आहे. शिवाय दरवाजाजवळच ही सीट असल्याने जागा शोधण्याची कटकट संपणार आहे.
पुढची सीट महिलांसाठी
By admin | Updated: January 22, 2015 03:19 IST