Join us

नवीन वर्षात मुंबईकरांना घडणार पालिका मुख्यालयाची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाच्या पुरातन वास्तूची विनामूल्य सफर नवीन वर्षात मुंबईकरांना करता येणार आहे. गेल्या ...

मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाच्या पुरातन वास्तूची विनामूल्य सफर नवीन वर्षात मुंबईकरांना करता येणार आहे. गेल्या वर्षी महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांच्यामध्ये याबाबत सामंजस्य करार झाला होता. कोरोना काळात हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. मात्र मुख्यालयाचे द्वार पर्यटनासाठी सुरू करण्यापूर्वी पालिकेची अंतिम तयारी सुरू आहे.

पालिकेच्या मुख्यालयाची इमारत ही सुमारे दीडशे वर्षे जुनी आहे. दगडी गॉथिल शैलीतील ही इमारत पुरातन वास्तूंमध्ये गणली जाते. जुनी पुरातन इमारत सर्वसामान्यांनाही पाहता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर या इमारतीतही गाईडच्या मदतीने या पुरातन वास्तूची माहिती (गाईडेड हेरिटेज वॉक) घेता येणार आहे. या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकताच घेतला.

* पर्यटकांना गार्डडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

* मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. मुख्य सभागृह, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे.

* पुरातन वास्तू असल्यामुळे महापौर तसेच पालिका आयुक्तांच्या दालनांसह अनेक भव्य दालने आहेत. इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा असून समोरच सेल्फी पॉइंट आहे.

* मुख्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलीकडेच ८४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.