मुंबई : प्रवासी वाढवण्याबरोबर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणा:या एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी भविष्यात नवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवाशांना मोबाइलवर एसटी सेवांची माहिती मिळावी, यासाठी एक नवीन ‘अॅप्लिकेशन’ आणले जाणार असून, यावर एसटी महामंडळाकडून कामही केल जात आहे.
मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सेवांनी भरारी घेतलेली असतानाच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेले एसटी महामंडळ मात्र यात बरेचसे मागे असलेले दिसते. रेल्वे, विमान सेवा आणि खासगी टॅक्सी सेवांनी आपले नवीन मोबाइल अॅप्लिकेशन आणल्यामुळे त्याचा बराचसा फायदा लोकांना मिळत आहे. हे पाहता एक बदल म्हणून आणि प्रवाशांना नवीन सुविधा देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून मोबाइल अॅप्लिकेशन आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महामंडळाकडून काम सुरू असून साधारण पाच ते सहा महिन्यांनंतर हे अॅप्लिकेशन प्रवाशांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. यात आगमन आणि निर्गमनाच्या एसटी बसेस, ठिकाण, आगार, स्थानक इत्यादी माहिती त्यामध्ये असणार आहे. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना कुठलेही दर आकारले जाणार नसल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
आणि उपाध्यक्ष संजय खंदारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एसटी महामंडळाकडून प्रवासी माहिती सुविधेअंतर्गत काही सेवा देण्यात येणार असून, याअंतर्गत ही मोबाइल अॅप्लिकेशन सेवाही देण्यात येईल. त्याचप्रमाणो या सुविधेअंतर्गत एसटीच्या वेबसाइटमध्ये बदल करतानाच ती नव्याने उपलब्ध केली जाणार आहे. तसेच स्थानक किंवा आगारात एसटीच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यावरही काम केले जात असल्याचे खंदारे यांनी सांगितले.