Join us

परवडणाऱ्या घरांसाठी नवे धोरण

By admin | Updated: February 1, 2015 01:37 IST

परवडणाऱ्या घरांसाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकार आखणार असून, या धोरणानुसार सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून दिली जातील,

मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकार आखणार असून, या धोरणानुसार सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी घर हक्क आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क आंदोलनाच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले असून, या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच प्रकाश मेहता यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये दत्ता इस्वलकर, श्वेता दामले, भानुदास वायंगणकर, विजया मंत्री, सुनील शिंदे यांचा समावेश होता.मुंबईकरांना परवडणारी घरे मुंबईतच उपलब्ध करून द्यावीत, म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या चाळी शासनाने विकसित कराव्यात; आणि त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त एफएसआयमधून मुंबईकरांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, जुन्या मोडकळीस आलेल्या चाळी आणि झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमातून मिळणाऱ्या अतिरिक्त एफएसआयमधून परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, खासगी विकासकाडून घरबांधणी प्रकल्पात २० टक्के घरे परवडणाऱ्या दरात देण्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्या शिष्टमंडळाने मेहता यांच्यासमोर मांडल्या.मेहता यांनी यावर मुंबईमध्ये ११ लाख परवडणारी घरे बांधण्याची सरकारची योजना असल्याचे सांगितले. या योजनेमध्ये डबेवाले, सफाई कामगार, पोलीस अशा घरांपासून वंचित असणाऱ्या प्रत्येक घटकाला सामावून घेतले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आंदोलनाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)