Join us

नवीन हँकॉक पूल दोन वर्षांत

By admin | Updated: January 11, 2016 02:21 IST

सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल पूर्णपणे तोडल्यानंतर, नवीन हँकॉक पूल कधी उभारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सुशांत मोरे,  मुंबईसॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल पूर्णपणे तोडल्यानंतर, नवीन हँकॉक पूल कधी उभारणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवीन हँकॉक पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियोजन करण्यात आले असून, दोन वर्षात तो साकारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या साठी साधारण ३० कोटी रुपये खर्च येईल.हँकॉक पूल जुना आणि धोकादायक झाला होता. हा पूल आणि ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने, मध्य रेल्वेवरील गाड्यांना भायखळा व सॅन्डहर्स्ट रोड दरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली होती. या पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबरपासून हातोडा चालविण्यात आला आणि हँकॉक पूल वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. याबाबत मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) ओ. कोरीयांनी सांगितले की, ‘नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्यक्षात या पुलाचे काम सुरू करण्यासाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागेल. नवीन पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरी दीड वर्षातच तो पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ जुन्या पुलाची रुंदी ही ६0 मीटर एवढी होती. नवीन पूल बांधताना रुंदी वाढवण्यात येणार असून, ती जवळपास ९0 मीटर एवढी केली जाईल. नव्या पुलाची उंचीही वाढवण्यात येणार आहे. सध्याच्या पुलाची उंची ४.९ मीटर एवढी होती आणि आता ती ६.५२५ एवढी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.