ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - नेहमी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता झटत असतो असे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्वसामान्य माणसानांच गाडीखाली चिरडल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या सलमान खानची भेट घेतल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंनी आज दुपारी वांद्रे येथील सलमानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. त्यानंतर एका राजकारण्याने एका गुन्हेगाराची भेट घेणे खरचं योग्य आहे का, राज यांना सलमानाच पुळका का आला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून आता राज ठाकरे त्यावर काय खुलासा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस व चौघा जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने काल सलामनला दोषी ठरवून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र काल संध्याकाळी त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीनही मिळाला आणि सलमान घरी परतला. त्याला भेटण्यासाठी काल रात्रीपासूनच सेलिब्रिटींची रीघ लागली असून आज दुपारी आधी अभिनेता आमिर खान व त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्याची भेट घेतली.