Join us
Daily Top 2Weekly Top 5

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने केंद्र सरकारची नवी फेलोशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या देशात परदेशातील विविध देशांतून अनेक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी येतात. आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या देशात परदेशातील विविध देशांतून अनेक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी येतात. आपल्या देशातील संस्कृती आणि संगीताचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून केंद्र सरकारतर्फे अशा विद्यार्थ्यांना १८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने देण्यात येईल, अशी घोषणा इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी वांद्रे येथे केली.

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वांद्रे पश्चिम येथे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांचे कुटुंबीय आणि भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आज (साेमवार) रंगशारदा सभागृह वांद्रे (प.) येथे खान यांच्या सांगीमय आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रसिद्ध गायक हरिहरन, पंडित शशी व्यास आणि खा. विनय सहस्त्रबुद्धे आदींसह संगीत आणि फिल्म जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री उस्ताद राशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे, सितारवादक जुबेर शेख आणि स्वरूप भालवणकर यांनी आपली कला सादर करीत आपल्या गुरूंना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना मंदार पुराणिक (तबला) आणि निरंजन लेले (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांचे १७ जानेवारीला निधन झाले. त्यांची श्रद्धांजली सभा साेमवारी झाली. यावेळी प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. खान साहब हे माणूस म्हणून खूप मोठे होते. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी सारख्याच आदराने ते बोलायचे, असे हरिहरन यांनी सांगितले, तर पंडित शशी व्यास म्हणाले की, खान साहेब यांची अलौकिक संगीत साधना होती, पण त्यांनी कधीच आपल्या गाण्याचे मार्केटिंग केले नाही. अत्यंत साधेपणा हाच त्यांचा दागिना होता.