Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या सुरक्षेचे नव्याने आॅडिट

By admin | Updated: March 26, 2015 01:29 IST

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगड येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले.

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगड येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी सदस्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येत्या ३ दिवसांत मुंडे यांच्या सुरक्षेचे नव्याने आॅडिट करून त्यानुसार सुरक्षा देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादीचे सदस्य विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्याला हात घातला. तीन महिने उलटूनही हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही अथवा मुंडे यांचा याप्रकरणी साधा जबाबही नोंदविण्यात आला नसल्याचे काळे म्हणाले. तर विरोधी पक्षनेते पद हे कोणत्याही पक्षाचे नव्हे, तर वैधानिक पद आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. तेव्हा आरोपींना अटक करण्यास उशीर का, असा सवाल राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, की ज्या दिवशी दगडफेक झाली त्या दिवशी गडावर त्या गर्दीतून विरोधी पक्षनेत्यांच्या गाडीवर दगड भिरकावल्यामुळे आरोपीची ओळख पटवणे कठीण झाले.मी जेव्हा आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा मला एका साध्या बॉडीगार्डचीही सुरक्षा नव्हती. मुख्यमंत्री झाल्यावर मात्र झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. ती मी नाकारली. पण ही सुरक्षा व्यक्तीला नसून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. या पदावरील व्यक्तीस असणारा धोका तपासून तशी सुरक्षा पुरविण्यात येत आहे व नाकारता येणार नाही, असे समितीने आपणास कळविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहास सांगितले.