Join us

असे ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ या पूर्वी कधीच झाले नाहीत; पर्रीकरांचा दावा

By admin | Updated: October 13, 2016 06:08 IST

आधीच्या संपुआ सरकारच्या काळातही ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आल्या होत्या, हा काँग्रेसचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी खोडून काढला

मुंबई : आधीच्या संपुआ सरकारच्या काळातही ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आल्या होत्या, हा काँग्रेसचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी खोडून काढला आणि अशा प्रकारची लष्करी कारवाई या पूर्वी कधीही झाल्याची आपल्याला माहिती नाही, असे सांगितले. काँग्रेसने पर्रीकर यांच्यावर टीका करत, सरकार आणि भाजपा देशाच्या सुरक्षेचे केवळ राजकारण करत नसून, दुटप्पीपणाने बोलत असल्याचे म्हटले आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष या कारवाईचे श्रेय घेऊन राजकारण करीत असल्याचा पर्रीकर यांनी इन्कार केला.बुधवारी मुंबईत झालेल्या दोन कार्यक्रमांत बोलताना पर्रीकर यांनी सर्जिकल स्ट्राइक्सवर सविस्तर भाष्य केले. ‘फोरम फॉर इंटेग्रेटेड नॅशन सेक्युरिटी’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्रीकर म्हणाले की, गेली दोन वर्षे मी संरक्षणमंत्री आहे. या पूर्वी कधीही सर्जिकल स्ट्राइक्स झाल्याची निदान मला तरी माहिती नाही. जे अशा स्ट्राइक्स झाल्याचे म्हणतात ते कदाचित ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम्स’नी केलेल्या कारवाईबद्दल बोलत असावेत. पण त्या सर्जिकल स्ट्राइक्स नव्हत्या.दोन्हींमधील फरक स्पष्ट करताना संरक्षणमंत्री म्हणाले की, ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम्स’च्या कारवाया भारतीय लष्कराप्रमाणेच जगभर केल्या जातात. यात सीमेवर उपद्रव देणाऱ्या प्रतिस्पर्ध्यास गप्प करण्यासाठी स्थानिक कमांडर आपल्या पातळीवर कारवाई करतात. अशी कारवाई करण्याआधी सरकारकडून आधी मंजुरी घ्यायची गरज नसते व लष्कर कारवाई केल्यावर त्याची माहिती सरकारला देते. म्हणून अशा कारवाईस गुप्तपणे केलेली कारवाई म्हटले जाते.याउलट २९ सप्टेंबर रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्स ही सरकारच्या पूर्व संमतीने केली गेलेली उघड कारवाई होती. यात अशी कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला व तो लष्करास कळविला. लष्करानेही त्यानुसार चोखपणे कारवाई पार पाडली.पर्रीकर म्हणाले की, याचे श्रेय आम्हाला (सरकार व सत्ताधारी) घ्यायचे असते तर संरक्षणमंत्री या नात्याने कारवाई केल्याची घोषणा मी स्वत: केली असती. पण आम्ही तसे केले नाही. कारवाईची अदिकृत घोषणा लष्कराच्या ‘डायरेक्टर आॅफ मिलिटरी आॅपरेशन्स’ने (डीजीएमओ) केली. यावरून या कारवाईचे स्वरूप व वेगळेपण स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)