मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, यासाठी नेस वाडिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने प्रीती झिंटा हिला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.‘आम्हाला सर्व संपवायचे आहे. तक्रारदाराचा विवाह झाला आहे. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली. दोघेही आयपीएल खेळाडूंच्या लिलावावेळी एकाच टेबलावर बसले होते,’ असे वाडिया यांचे वकील आबाद पौडा यांनी न्या.आर. एम. सावंत, न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने प्रीती झिंटाला या याचिकेसंदर्भात ३० आॅगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. तक्रारीनुसार, प्रीती झिंटा व नेस वाडिया हे आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब या टीमचे सहमालक होते. ३० मे २०१४ रोजी वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या टीमचा सामना सुरू असताना, टीमच्या कर्मचाऱ्यांना वाडिया शिवीगाळ करत होते. त्यावर प्रीतीने त्यांची टीम जिंकत आल्याने शांत राहण्यास सांगितले. मात्र, नेस वाडिया यांनी प्रीतीलाच शिवीगाळ केली व तिच्या दंडांना घट्ट पकडले.या घटनेबाबत प्रीतीने १३ जून २०१४ रोजी नेस वाडिया यांच्यावर गुन्हा नोंदविला. याबाबत पोलिसांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये वाडिया यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. वाडिया यांनी हे गैरसमजामुळे घडल्याचे याचिकेत म्हटले आहे.
विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी नेस वाडिया न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 2:38 AM