Join us  

बेस्ट बसला आग लागण्यास निष्काळजीपणा जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 2:28 AM

बेस्ट समिती सदस्यांचा आरोप : फायर एक्स्टिंग्विशर न निघाल्यामुळे भडकली आग

मुंबई : माटुंगा येथे आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या बेस्ट बसमधील फायर एक्स्टिंग्विशर वेळीच न निघाल्यामुळे आग आणखी भडकली. १० जुलै रोजी या बसगाडीची तपासणी झाली होती. तरीही अशी दुर्घटना घडत असल्याने बेस्ट प्रशासनाचा निष्काळजीपणाच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप बेस्ट सदस्यांनी शुक्रवारी केला. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडीमध्ये माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाजवळ बुधवारी अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने बेस्ट समिती सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या बसमधील फायर एक्स्टिंग्विशर वेळीच निघाले असते तर आगीवर नियंत्रण मिळवता आले असते, असे सदस्यांनी निदर्शनास आणले.‘शॉर्टसर्किटमुळे आग’बेस्ट प्रशासनाने या दुर्घटनेचा अहवाल बेस्ट समितीसमोर शुक्रवारी सादर केला. ही बस वैशालीनगरहून वरळी आगार येथे जात असता सायंकाळी साडेचारच्या सुमारास महेश्वरी उद्यान येथे आली असता, बसच्या स्विच बोर्डमधील जंक्शन बोर्डच्या आतमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वायरिंगच्या संचास आग लागून बसचालकाची केबिन व प्रवाशांपर्यंत पसरली, असे या अहवालात म्हटले आहे.बसचालकाने दाखविले प्रसंगावधानबसमधील वायरिंगला आग लागताच चालकाने सर्वप्रथम प्रवाशांना बसमधून उतरवले. त्यानंतर नजीकच्याच हॉटेलमधून चार फायर एक्स्टिंग्विशर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या मार्गावरून जाणाऱ्या बेस्टच्या अन्य तीन बसगाड्यांना थांबवून त्यातील फायर एक्स्टिंग्विशरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आग भडकली असल्याने अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. अशा धाडसी बसचालकाचे कौतुक करणे गरजेचे असल्याचे बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले....म्हणून आग भडकलीबसच्या स्विच बोर्डमधून धूर येऊ लागला तेव्हा वायरला आग लागली होती. अशा वेळी बस चालकाने बसवाहकास फायर एक्स्टिंग्विशर आणण्यास सांगितले. मात्र ते वेळीच निघाले नाही, म्हणून बस चालकाचा नाइलाज झाला व त्याला त्या वेळी काहीच करता आले नाही व आग पसरली. या बसची शेवटची तपासणी १० जुलै रोजी करण्यात आली होती. त्यात फायर एक्स्टिंग्विशरची तपासणी करण्यात आली होती का, असा सवाल समिती सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी केला.साप किंवा उंदरांनी कुरतडली वायर?आगीत खाक झालेली बस वरळी आगाराची होती. वरळी आगार हे टेकडीच्या पायथ्याशी असल्याने टेकडीवरील सापांचा वरळी आगारात मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे या बसची वायरिंग साप किंवा उंदरांनी कुरतडली का? याचा शोध घ्यावा लागेल, असे मत चेंबूरकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :बेस्टमुंबई