नवी मुंबई : सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पालिकेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. रस्त्यावर साचणारे पाणी वाहण्यासाठी मार्गच मोकळे नसल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिकांना काही काळ पूरपरिस्थितीचा अनुभव घ्यावा लागला.गेली दोन दिवस शहरात जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिक सुखावले असले तरी तुंबणाऱ्या पाण्यामुळे गैरसोयीला देखील सामोरे जावे लागले. शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे सेक्टर १७, सानपाडा रेल्वे स्थानक लगत, नेरुळ रेल्वे स्थानक लगत तसेच बेलापूर व इतरही काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यालगत गटारे बनवण्यात आली आहेत. या गटारांची सफाई पावसाळापूर्व कामाअंतर्गत नुकतीच झालेली आहे. परंतु गटारांमधील गाळ रस्त्यालगत ठेवल्यानंतर तो उचलला गेलेला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस पाऊस पडताच पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन ठिकठिकाणी रस्त्यावर तळे झाले होते. पर्यायी साचलेल्या या पाण्यातून वाट काढत चालावे लागत असल्याचा मनस्ताप रहिवाशांनी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी तर वाहनचालकांना देखील साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
पालिकेचा निष्काळजीपणा पावसात उघड
By admin | Updated: June 13, 2015 04:22 IST