Join us  

अकरावीतच द्यावी लागतेय नीट-यूजीची अग्निपरीक्षा

By रेश्मा शिवडेकर | Published: March 11, 2024 8:21 AM

पर्सेंटाइलवर परिणामाची भीती, यंदा विक्रमी नोंदणी

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा इतक्या टोकाला गेली आहे की, वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट - अंडर ग्रॅज्युएट (नीट-यूजी) या परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी अनेक विद्यार्थ्यांना यंदा अकरावीलाच या अग्निदिव्याला सामोरे जावे लागत आहे. 

क्लासचालकांच्या आग्रहास्तव ११वीचे लाखो विद्यार्थी देशभरातून नीट-यूजीकरिता नोंदणी करत आहेत. त्यामुळे नोंदणीचा विक्रम प्रस्थापित झाला असला तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढून नीट-यूजीचा पर्सेंटाईल खाली येण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा या परीक्षेसाठी २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. 

यंदा नीट-यूजीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी दहावी-अकरावीचे निकाल, जात प्रमाणपत्र अशी कोणतीच कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक नाही. एनटीएकडून  मिळालेल्या या सवलतीचा गैरफायदा घेतला जात आहे. अकरावीचा निकाल अपलोड करणे बंधनकारक नसल्याने अनेक क्लासचालकांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना नीट-यूजी देण्यास सांगितले आहे. 

शुल्क वाचविण्यासाठी...

जात प्रमाणपत्र देणेही बंधनकारक नसल्याने शुल्काची रक्कम वाचविण्यासाठी अकरावीचे विद्यार्थी आरक्षणातून नोंदणी करत आहेत. कारण खुल्या गटासाठी १,७०० रुपये इतके नोंदणी शुल्क आहे. तर एससी-एसटींकरिता ८०० रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. 

पालकांना आर्थिक भुर्दंड

एनटीए वेबसाइटच्या तांत्रिक घोळामुळे नीट-यूजीकरिता अनेक पालकांच्या बँक खात्यातून दोन ते तीन वेळा शुल्काची रक्कम वळती झाली आहे. हे पैसे परत मिळण्याची कोणतीही तरतूद नसल्याने पालकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :शिक्षणपरीक्षा