Join us

‘व्यवसायासाठी स्वत:च्या कल्पना असणे गरजेचे’

By admin | Updated: January 9, 2017 07:15 IST

स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या मदतीने आपण व्यवसाय करू शकतो, व्यवसायात विश्वास हाच एक मोठा ब्रँड आहे, असे प्रतिपादन नितीन पोतदार यांनी केले.

मुंबई : स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या मदतीने आपण व्यवसाय करू शकतो, व्यवसायात विश्वास हाच एक मोठा ब्रँड आहे, असे प्रतिपादन नितीन पोतदार यांनी केले. आयुष्यात कोणतेही काम करताना आत्मविश्वासाने करावे. आपल्याकडे असलेले कौशल्य, अनुभव आणि कल्पना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. या सर्व काही गोष्टी आपल्यात असतील तर इतरांपेक्षा आपण काही तरी वेगळे करू शकतो, असा विश्वासही पोतदार यांनी व्यक्त केला. विलेपार्ले येथील म.ल. डहाणुकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडाळाच्या वतीने आयोजित ‘टेक आॅफ’ या कार्यक्रमांतर्गत मराठी उद्योजक आणि उद्योजकता विषयावर प्रकाशझोत टाकला. महाविद्यालयात आपण जास्तीत जास्त पदवी घेऊ शकतो, ती पदवी आपले कौशल्य नसते. मुलांनी आपले निर्णय स्वत:हून घेतले पाहिजेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:च्या कल्पना असणे गरजेचे असते, त्या कल्पना तयार करण्यासाठी समाजातील माणसांना जोडणे गरजेचे आहे.कल्पना फक्त डोक्यात ठेवून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी हातामध्येही तेवढे बळ असावे लागते. दरवर्षी भारतात तंत्रज्ञानामुळे हजारो मुले बेरोजगार होतात. आताच्या पिढीतील मुलांकडे नोकऱ्या आहेत, पण अपुऱ्या कौशल्यामुळे नोकऱ्या गमवाव्या लागतात. आताची तरुण पिढी मोबाइल आणि इंटरनेटमध्ये गुंतलेली असते, अशी खंत या वेळी नितीन पोतदार यांनी मांडली. (प्रतिनिधी)