Join us
Daily Top 2Weekly Top 5

संमिश्र पद्धतीने शाळा सुरू करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेले दीड वर्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेच; मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले दीड वर्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेच; मात्र त्याचसोबत त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक समस्यांतही वाढ झाली आहे. राज्याच्या अनेक भागांत ऑनलाइन शिक्षण परवडत नसल्याने बालविवाह, बालमजुरी अशा प्रकारांतही वाढ झाली. त्यामुळे हायब्रीड म्हणजेच संमिश्र पद्धतीने का होईना शाळा लवकर सुरू कराव्यात असा सूर शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

येत्या १७ ऑगस्टपासून राज्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, टास्क फोर्सकडून त्याला विरोध झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला. आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय एकांगी असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या तपासणीअंती त्यातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळून आली. हीच आकडेवारी राज्यस्तरावर सारखी असू शकते आणि असे असल्यास शाळा खबरदारी घेऊन सुरू केल्यास किमान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, भावनिक, मानसिक नुकसान थांबू शकेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शासनाने आता आरोग्य आणि शिक्षण यांच्यात समन्वय साधून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे मत शाळा मुख्याध्यापक अजित वर्दे यांनी व्यक्त केले आहे. एकूणच शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांकडून आरोग्य आणि शिक्षणाचा समतोल साधून शाळा सुरू व्हायला हव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अमेरिकेसारख्या देशात नर्सरीमधील मुलांना शाळांत उपस्थित राहण्यासाठी चाचण्या होत असताना भारतात अशा नियोजनाबद्दल काहीच आराखडा नाही. आता नियोजनाचा आरखडा तयार करण्याची वेळ आली असून, मुलांना आणखी किती वर्षे प्रत्यक्ष शिक्षणापासून दूर ठेवणार असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ स्वाती पोपट वत्स यांनी केला आहे.

कोट

शाळा संमिश्र पद्धतीने सुरू करण्याची वेळ आली आहे, ते शक्य नसल्यास किमान दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग, त्यांच्या मंडळाच्या परीक्षा समोर ठेवून तरी सुरू करायला हवेत. कोरोनाची रुग्णसंख्या शून्यावर यायची वाट पाहत बसून विद्यार्थ्यांचे शिक्षण शून्यावर आणायला नको.

फ्रान्सिस जोसेफ, शिक्षणतज्ज्ञ