Join us  

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:56 AM

शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे.

मुंबई : शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी व्यक्त केले.के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीज्च्या २५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून राज्यपाल म्हणाले, प्राचीन काळापासून भारताला जगातील एक महान संस्कृतींमध्ये गणले जाते. भारत म्हणजे इतिहास, संस्कृती, विश्वास आणि तत्त्वज्ञानाचे भांडार आहे. भारताने नेहमीच विविध विचार, विश्वास, नवीन कल्पनांचे स्वागत केले आहे. भारताची भूमी बौद्ध, जैन, शीख धर्म आणि इतर अनेक पंथ तसेच विश्वासांचे जन्मस्थळ आहे. भारताने मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि इतर धर्मांचेच नव्हेतर, नास्तिक विचारांचेही स्वागत केले. भारतातून आशियासह इतर देशांमध्ये बौद्ध भिक्खू तसेच व्यापाऱ्यांनी येथील कला, शिल्पकला, ध्यान पद्धती, भाषा आणि मार्शल आर्ट आदींचे ज्ञान यांचा प्रसार केला.या परिषदेसाठी भारतासह चीन, हाँगकाँग, जपान, नेदरलँड, थायलंड, जर्मनी, पोलंड, कंबोडिया आदी देशांतील बुद्ध विचारांचे विद्वान तसेच अभ्यासक, सोमय्या शिक्षणसंस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.