नामदेव मोरे, नवी मुंबईमहापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाकडे नवीन वाहनांची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते व सभागृहनेत्यांनीही त्यांचाच कित्ता गिरविला आहे. विकासकामांऐवजी वाहनांसाठी सुरू झालेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे सोपस्कार पार पडले आहेत. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते व सभागृहनेते या प्रमुख चार पदांची निवड झाली असून सर्वांनी पदभार स्वीकारला आहे. स्थायी समिती सभापती, विषय समित्या, प्रभाग समितीची निवड अद्याप झालेली नाही. नवीन पदाधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केले असून शहरातील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या विकासकामांना प्राधान्य मिळणार याविषयी शहरवासीयांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. पदभार स्वीकारताच प्रमुख चार पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे नवीन वाहनांची मागणी केली आहे. महापौर सुधाकर सोनावणे यांनी इनोव्हा, उपमहापौर अविनाश लाड यांनी होंडा सिटी, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले व सभागृह नेते जयवंत सुतार यांनी स्कॉर्पिओची मागणी केली आहे. वास्तविक यापूर्वीच्या महापौरांच्या ताफ्यात दोन वाहने आहेत. दोन्ही वाहने वापरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. उपमहापौरांकडे अँबेसिडर कार आहे. परंतु ती बिघडल्यामुळे सद्यस्थितीमध्ये परिमंडळ एकच्या उपआयुक्तांची गाडी त्यांना देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते व सभागृह नेते वापरत असलेली वाहनेही सुस्थितीमध्ये आहेत. तत्काळ वाहने बदलण्याची आवश्यकता नाही. परंतु चारही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नवीन वाहनांसाठी अर्ज केल्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. अजून स्थायी समिती व विषय समिती सभापतींची निवडणूक झालेली नाही. संबंधितांकडूनही नवीन वाहनांची मागणी होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनांच्या मागणीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या ताफ्यात असणारी वाहने सुस्थितीत असतील तर तत्काळ नवीन वाहने घेऊ नयेत. आहेत तीच वाहने पदाधिकाऱ्यांना द्यावीत, असे मत व्यक्त केले जात आहे. पदाधिकाऱ्यांनीही महापालिकेस भुर्दंड बसणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रशासनाकडे चारही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागणीचे पत्र पोहचले आहे. प्रतिक्रिया घेण्यासाठी महापौर सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु होऊ शकला नाही.
नवीनच गाडी हवी!
By admin | Updated: May 15, 2015 23:50 IST