Join us

‘हेल्पलाइन’ जनजागृती हवी

By admin | Updated: November 25, 2015 01:54 IST

मुंबईत दररोज हजारो महिला कामानिमित्त प्रवास करतात, कधी त्यांना कामासाठी जास्त वेळ कार्यालयात थांबावे लागते.

मुंबई: मुंबईत दररोज हजारो महिला कामानिमित्त प्रवास करतात, कधी त्यांना कामासाठी जास्त वेळ कार्यालयात थांबावे लागते. त्याचप्रमाणे इतरत्रही फिरायला तसेच विविध कामांसाठी जाणाऱ्या महिलांना मदतीसाठी असणाऱ्या हेल्पलाइनबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कॉलेज तरुणींमध्ये १०३ सह विविध हेल्पलाइनबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही. गृहिणींना बातम्यांमार्फत ही हेल्पलाइन माहिती आहे.याबाबत अधिक जनजागृती व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे.पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात १५ जणांची टीम कार्यरत आहे. १०० क्रमांकाचे काम पाहणाऱ्या पथकाशेजारीच ही टीम कार्यरत आहे. मोहीम विभागाचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या नियंत्रणाखाली या हेल्पलाइनचे कामकाज सुरु आहे. विशेष म्हणजे येथे महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. या महिलांना कॉल हाताळण्यापासून महिलांशी कसे बोलावे याबाबतचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कॉल च्या वाढत्या संख्येमुळे त्यांंना हेडफोन देण्यात आले आहेत. त्यामुळे कॉल हाताळण्यास महिला कर्मचाऱ्यांना मदत होत आहे. नियंत्रण कक्षास एखादा कॉल आल्यास त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ नियोजन करण्यात येते. यासाठी संबधित पोलीस ठाण्यात असलेल्या पाच वाहनांपैकी एक वाहन हे नेहमीच राखीव असते. नियंत्रण कक्षात एखाद्या ठिकाणाहून कॉलबाबत गंभीरता जाणवत असल्यास त्या ठिकाणी संबधित पोलीस ठाण्याचे पथक दाखल होते. या वाहनामध्ये महिलेची तक्रार जाणून घेण्यासाठी एक महिला कर्मचारी सदैव असते. (प्रतिनिधी)महिलांसाठी वेळोवेळी नियंत्रण कक्षाकडून मदत देण्यात येते. त्यात काही क्वचित मोबाइल नेटवर्कमुळे कॉल दुसरीकडे जाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्याही त्रुटी लवकरच दूर होणार आहेत. अत्याचाराला बळी न पडता महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत.- संजय बारकुंड, डीसीपी आॅपरेशन विभागहेल्पलाइनमुळे ती बचावली...१६ जुलै २०१५ रोजी एका महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. मला एका इसमाने कोलकाता येथून पळवून आणले असून गॅ्रण्टरोड येथील इमारतीत डांबून माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली. यापूर्वी याच इमारतीत समाजसेवा शाखेची धाड पडली होती. परंतु पोलीस माझ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. इमारतीसमोर मोठे झाड आहे. आणि त्याखाली एक बाईक पार्क केली आहे. फक्त याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष देसाई आणि त्यांच्या पथकाने महिलेचा पत्ता शोधून काढला. तिची सुखरुप सुटका केली.