Join us  

नावीन्यपूर्ततेचा शोध घेणे गरजेचे - डॉ. सतीश रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:48 AM

मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पार पडलेला दीक्षान्त समारंभ हा राज्यपालांच्या अनुपस्थितीत पार पडला. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपालांना दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहता आले नाही.

मुंबई : भविष्यकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सतत नावीन्यपूर्ततेचा शोध घेणे गरजेचे आहे. नवनवीन कल्पना आणि शक्यता समजण्याची क्षमताच सतत बदलत्या जगात अग्रेसर राहण्यासाठी मदत करणार आहे. नावीन्यपूर्ततेचा ध्यास या युगमंत्राने आपले पाऊल प्रगतीच्या दिशेने पडणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध भारतीय वायु-अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.ते म्हणाले, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या जोरावर समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती होऊ शकेल यासाठी विद्यापीठ आणि संस्थागत स्तरावरील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनाची गरज असून त्याची योग्य ती सांगड संशोधन व विकास आणि इंडस्ट्रीसोबत घालणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमून केले. एटॉमिक, स्पेस आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीने भारताला सक्षम केले आहे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेणे हे आपले अंतिम लक्ष्य असावयास हवे. मिशन शक्ती आणि मिशन चांद्रयान-२ या दोन घटनांमुळे शास्त्रज्ञांच्या अथक आणि अभिनव प्रयत्नातून संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेचे दर्शन घडले आहे. राज्याचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात आणि त्यांच्या उपस्थितीत ते विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारतात. मात्र मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पार पडलेला दीक्षान्त समारंभ हा राज्यपालांच्या अनुपस्थितीत पार पडला. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपालांना दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहता आले नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची विद्यापीठाचे कुलपती म्हणून अध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ असणार होती.यंदाच्या दीक्षान्त समारंभात विविध विद्याशाखांतील ४१३ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात आल्या. प्रा. अविनाश बिनीवाले यांना डी.लीट आणि डॉ. बाळकृष्ण नारखेडे यांना डी.एस्सी पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या १४ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात आली. त्याचबरोबर २ पारितोषिके ही कुलपती पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावे आणि एक कुलपती पदक देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. जी. सतीश रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.तसेच पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,६८,२३९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ९० हजार ३९३ विद्यार्थिनी तर ७७ हजार ८४६ विद्यार्थ्यांचा समावेश असून पदवीसाठी १ लाख ३९ हजार ८३ तसेच पदव्युत्तरसाठी २९ हजार १५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी १९,७८४, आंतरविद्याशाखेसाठी ८,०३२, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ८८,४०२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५२,०२१ पदव्यांचा समावेश आहे.दीक्षान्त समारंभात ‘नाना शंकरशेठ पगडी’मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात यंदा बदललेला पोशाख दिसून आला. मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या दीक्षान्त समारंभात ब्रिटिशकालीन पोशाखाऐवजी शौर्याचे प्रतीक म्हणून शिवकालीन अंगरखा, सुंदरता म्हणून पैठणीची बॉर्डर आणि विद्वत्ता म्हणून मुंबई विद्यापीठाचे पहिले ‘फेलो’ जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांची पगडी असा पोशाख करण्यात आला होता.व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या निर्णयानुसार पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी खादी ग्रामोद्योग येथून कापड खरेदी केले असून तज्ज्ञ शिंपीकडून शिष्टाचारानुसार विविध रंगांचे पोशाख शिवण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पोशाखात बदल झाला नसून हा झालेला बदल केवळ दीक्षान्त समारंभाच्या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अधिष्ठाता, वित्त व लेखा अधिकारी, विविध प्राधिकरणाचे मान्यवर सदस्य यांच्यापुरताच मर्यादित आहे. मुंबई विद्यापीठाच्या या बदललेल्या ड्रेसकोडची चर्चा समाजमाध्यमावर जोरदार सुरू आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्र