Join us  

सर्वच मराठी शाळांमध्ये डिजिटलायझेशनची आवश्यकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:45 AM

बौद्धिक संपदेसाठी गरजेचे : मैदानांच्या परिस्थितीतही सुधारणेस वाव

सीमा महांगडे मुंबई : बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लास रूम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र आतापर्यंतची पालिका शाळांतील डिजिटलायझेशनची परिस्थिती पाहता ती फारशी चांगली नसल्याचे चित्र ‘लोकमत’ आणि मराठी अभ्यास केंद्रांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शाळांतील डिजिटलायझेशन आणि त्यांना असलेली मैदाने, शाळांमध्ये असलेली ग्रंथालये ही शाळांची विद्यार्थ्यांसाठी असलेली खरी संपत्ती आहे. शाळांमधील या स्रोतांच्या आधारावर विद्यार्थी बौद्धिक आणि शारीरिक संपदा प्राप्त करून यशस्वी ठरत असतो. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मराठी माध्यमाच्या शाळा असो किंवा मराठी खासगी अनुदानित शाळांमध्ये याविषयीची स्थिती चिंताजनक असल्याचे मत सर्वेक्षणाच्या माध्यमातून विलास डिके यांनी मांडले.

मराठी अभ्यास केंद्र्राच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणामध्ये या स्थानातील ग्रंथालये, मैदाने यांमध्ये शाळांना सुधारणा करण्यास भरपूर वाव असल्याचे वास्तव मांडण्यात आले आहे. मराठी अभ्यास केंद्र्राने सर्वेक्षण केलेल्या एकूण शाळांपैकी १३३ शाळांमध्ये संगणक कक्ष आहेत. खरे तर संगणक कक्ष सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यात मराठी शाळा कमी पडत आहेत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. सर्वेक्षण केलेल्या रात्रशाळांमध्ये संगणकी कक्षाचीही सुविधा नसल्याचे समोर आले आहे. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये दिवस शाळा आणि रात्रशाळा विद्यार्थी असे वर्गीकरण आधीपासूनच आहे़ त्यातही डिजिटलायझेशनच्या सुविधाच या शाळांमध्ये नसल्याने विद्यार्थी, पालक अशा शाळांकडे पाठ फिरवीत आहेत. सर्वेक्षणात सहभागी केवळ १३३ शाळांमध्ये ग्रंथालये आहेत. तर १०४ शाळांमध्ये मैदाने आहेत. ९७ शाळांमध्ये स्वत:चे सभागृह असल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे मैदाने आणि ग्रंथालये यांची परिस्थितीही फारशी सुस्थितीत नसल्याचे स्पष्ट आहे. समाधानाची बाब म्हणजे सर्वेक्षण केलेल्या ९८ शाळांमध्ये संभाषणात्मक इंग्रजीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे मराठी शाळांमध्येही इंग्रजीचे सुरू असलेले वर्ग विद्यार्थीसंख्या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. काही स्वयंसेवी संस्था या पालिकेच्या शाळांना डिजिटलायझेशन आणि इंग्रजी विषयासाठी सराव, शैक्षणिक साहित्य यांसाठी मदत करत आहेत़ या शाळा खासगी मराठी शाळांना मदत करताना दिसून येत नाहीत हे चित्रही या वेळी समोर आले आहे. एकूणच मराठी शाळांमध्ये ग्रंथालये, डिजिटलायझेशन, मैदाने यांच्या बाबतीत सुधारणा होण्यास वाव आहे. स्वयंसेवी संस्थांनी खासगी मराठी शाळांनाही पाठिंबा दिल्यास या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे निरीक्षण डिके यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मराठी