Join us
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी क्षेत्रावरील अधिकारांसाठी स्वायत्त सागरी परिषदेची गरज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 18:59 IST

मुंबईतील पूर्वीची विस्तारलेल्या कोळीवाड्यांवर  अतिक्रमणाने झालेला प्रश्न, आभाळ फाडणा-या या इमारतींनी कोळीवाडेही फाडलेले आहेत

समुद्र आणि मासेमारी क्षेत्रावर किनारपट्टीवरील पारंपारिक मासेमार जाती-जमातींना त्यावर अधिकार आणि त्यांच्या उपजीविकेचा पर्यावरण समतोल विकास साधण्यासाठी पारंपरिक मच्छीमार समाजाची स्वायत्त सागरी परिषद निर्माण करावी अशी मागणी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी केली

मच्छीमारांचे राष्ट्रीय नेतेे,वेसाव्याचे माजी नगरसेवक कै मोतीराम भावे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त द्रष्टा लोकनेता मोतीराम भावे या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री अँड अनिल परब यांच्या शुभहस्ते चिल्ड्रन वेलफेयर सेंटरच्या सभागृहांत झाले,त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पाटील बोलत होते

मुंबईतील पूर्वीची विस्तारलेल्या कोळीवाड्यांवर  अतिक्रमणाने झालेला प्रश्न, आभाळ फाडणा-या या इमारतींनी कोळीवाडेही फाडलेले आहेत, त्यांचे संरक्षण करावे, त्यासाठी कोळी समाजाला त्यांच्या अधिकाराचा हक्क आपण दिला पाहिजे आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण जमिनीवर सातबारा देतो त्याप्रमाणे मासेमारी क्षेत्र सागरी क्षेत्र यावर सातबारे पारंपारिक मच्छीमारांचे, कोळी समाजाचे झाले पाहिजेत यासाठी  स्वायत्त सागरी परिषद निर्माण करावी अशी अशी मागणी त्यांनी शासनाचे प्रवक्ते आणि संसदीय कार्य मंत्री या नात्याने अँड अनिल परब यांच्या कडे करीत असल्याचे त्यांनी  सांगितले.

आपल्या भाषणात अँड.अनिल परब यांनी मोतीराम भावे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.1995 साली दिवंगत खासदार मधुकर सरपोतदार यांच्या निवडणुकीपासून आपला मोतीराम भावे यांचा संबध आला.मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी लढवय्ये नेते म्हणून त्यांची ख्याती होती.1973 ते 1992 असे 19 तब्बल वर्षे नगरसेवक असतांना  मढ,वेसावे ते अंधेरी पर्यंतच्या परिसराचे त्यांनी नेतृत्व केले आणि याभागाचा त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मच्छिमारांना त्यांचे न्याय व हक्क मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सुटण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी यावेळी  दिले.

यावेळी परिवहन मंत्री अँड अनिल परब, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील, स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर,मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर चे प्राचार्य अजय कौल सर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी , पालिकेचे माजी सभागृह नेते शैलेश फणसे , स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, नगरसेविका रंजना पाटील आणि इतर मान्यवरांनी मोतीराम भावे यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

 स्वराज सामाजिक संस्था,एकता मंच,महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत आणि प्रस्तावना पंकज भावे यांनी केली तर आभार प्रदर्शन नंदकुमार भावे यांनी केले तर सूत्रसंचालन योगेश केळवेकर यांनी केले.यावेळी मोतीराम भावे यांचे चाहते व वेसावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई