Join us  

‘नीट’ पार पडली वैद्यकीय प्रवेशासाठीची परीक्षा, २० महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 2:54 AM

काही ठिकाणी परीक्षेचे केंद्र ऐनवेळी बदलले असल्याने विद्यार्थी पालकांची कसरत झाली.

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट (यूजी) ही सामायिक प्रवेश परीक्षा देशभरात रविवारी पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावरील योग्य त्या खबरदारीपासून विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा या सगळ्याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आणि दुपारी २ ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा नीट पार पडली. काही ठिकाणी परीक्षेचे केंद्र ऐनवेळी बदलले असल्याने विद्यार्थी पालकांची कसरत झाली.देशभरातून नीट (यूजी)साठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ३,८४२ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. कोरोनाची वाढती संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी आधीपासून परीक्षा केंद्रांवर  स्लॉट्सनुसार हजर राहायला सांगितले होते. स्लॉट्समध्ये विद्यार्थ्यांना बोलवून आतमध्ये थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करून या वातावरणात परीक्षा सर्व नियमांचे पालन करून घेतले गेले.मुंबईतील एचआर, जयहिंद, रुईया, ठाकूर, साठे, आर.एन. पोदार, के. जे. सोमय्या, आयसीटी माटुंगा, एसआयडब्ल्यूएस, अंजुमन इस्लाम, थडमल साहनी, केंद्र्रीय विद्यालये - कुलाबा , अशा २० शाळा-महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून वापर करण्यात आला होता.काही ठिकाणी गोंधळ, परीक्षेवर परिणाम नाहीवडाळ्याच्या एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयात नियमांचे पालन करण्यात थोड्या चुका झाल्या असून विद्यार्थ्यांना १२ नंतर प्रवेश देण्यात आला. तसेच २ ऐवजी २.३० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. मात्र त्यानंतर त्यांना २० मिनिटे वाढवूनही देण्यात आली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तसेच एनटीएकडून आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेची काही केंद्रे दोन दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती. मात्र, या बदललेल्या केंद्र्रांची माहिती नसल्याने पालकांची केंद्रावर पोहोचण्यास धावपळ झाली.

टॅग्स :परीक्षा