Join us

राष्ट्रवादीची घसरगुंडी : सेना, भाजपा, काँग्रेसची भरारी

By admin | Updated: April 26, 2015 22:40 IST

या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांच्या नगरसेवकांत वाढ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची घसरगुंडी झाली आहे.

अंबरनाथ : या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांच्या नगरसेवकांत वाढ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची घसरगुंडी झाली आहे. मनसे आणि रिपाइंलाही या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला आहे. २०१० च्या सार्वत्रिक निवडणूक निकालात ५० पैकी शिवसेनेचे १६, रिपाइं सेक्युलरचे ९, राष्ट्रवादीचे ८, मनसेचे ६, काँग्रेसचे ३, भाजपा १ आणि अपक्ष ७ असे संख्याबळ होते. त्यामध्ये वाढ करण्याचा प्रत्येक पक्षाने प्रयत्न केला. मात्र, २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ शिवसेना, भाजपा, काँग्रेस यांनीच भरारी घेतल्याचे पाहायला मिळाले. एकूण ५७ जागांपैकी शिवसेनेने २६, भाजपाने १० तर काँग्रेसने ८ जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढवून ३ वरून ८ वर भरारी घेतली आहे. असाच प्रकार भाजपाने एका जागेवरून संख्याबळ १० वर नेले आहे. भाजपाच्या दोन जागा ४ आणि ११ मतांच्या फरकाने पडल्या आहेत. तीन पक्षांचे नगरसेवक वाढले असताना मात्र मनसेचा आकडा ६ वरून २ वर खाली आला आहे. राष्ट्रवादीला ८ वरून केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही दोन जागा या रिपाइं सेक्युलरच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस अवघ्या ३ वर तर रिपाइं ९ वरून २ वर घसरली आहे. अपक्षांचा आकडाही यंदा एकने घटून ६ झाला आहे. असे असले तरी सत्तेचे गणित मात्र या अपक्षांभोवती फिरत आहे. शिवसेनेने भाजपासोबत जमवून घेतल्यास सत्तेचे गणित जास्त स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)