नवी मुंबई : शहरात सर्व प्रकारच्या सुविधा महापालिका पुरवत असल्याने सिडकोची आवश्यकता नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात सिडको हटावचा नारा दिला. शहराचा अर्धा विकास झालेला असून अर्धा बाकी आहे. त्याकरिता सामूहिक विकासाच्या माध्यमातून शहराचा विकास होणे गरजेचे असल्याचेही माजी मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले. वन टाइम प्लानिंगच्या मुद्द्यामध्ये त्यांनी पुन्हा हात घातला. वन टाइम प्लानिंग हा आपला मुख्य अजेंडा असल्याचेही ते म्हणाले. क्लस्टर डेव्हलपमेंट व एफएसआयचा निर्णय वेळीच होणे गरजेचे होते. मात्र ज्यांना माझ्या नेतृत्वाखाली हा निर्णय होऊ द्यायचा नव्हता, त्यांनीच वेळोवेळी बैठका उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपकेला. शहरात विकासाचा अजेंडा घेऊन आलेल्यांनी प्रथम ठाणे व मुंबईचा विकास करून दाखवावा, त्यानंतर इथे आश्वासने द्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. निवडणुकीत आघाडी कोणाशी करू, असे सांगणा-या काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिडको हटाव
By admin | Updated: April 19, 2015 00:20 IST