Join us

काँग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीची नजर

By admin | Updated: September 19, 2014 01:16 IST

आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी दोन्ही पक्षांकडून जागांच्या अदलाबदलीसाठी चाललेल्या प्रयत्नांना मात्र वेग आला आहे.

गौरीशंकर घाळे - मुंबई
आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी दोन्ही पक्षांकडून जागांच्या अदलाबदलीसाठी चाललेल्या प्रयत्नांना मात्र वेग आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीला दोन जागा वाढवून हव्या आहेत तर काही जागांमध्ये बदल हवा आहे. मतदारसंघाच्या अदलाबदलीस अनुकूलता दाखवितानाच वाढीव जागांबाबत मात्र काँग्रेसने मौन बाळगले आहे. 
घाटकोपर पश्चिममध्ये हारून खान, राजू घुगे आदी सक्षम नेते आपल्याकडे असल्याने हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. त्याबदल्यात भांडुपची जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेसने याबाबत अनुकूलता दाखविली आहे. जे.पी. सिंग, सुरेश कोपरकर आणि नारायण राणो समर्थक श्याम सावंत आदी नेत्यांमुळे मनसेचे विद्यमान आमदार शिशिर शिंदेंना टक्कर देणो शक्य असल्याची भावना काँग्रेसमध्ये आहे. जे.पी. सिंग आदी नेत्यांनी तर कोणत्याही परिस्थितीत भांडुपमधून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. 
राष्ट्रवादीच्या कोटय़ातील गोरेगाव मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडून राष्ट्रवादीच्या शरद रावांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. 2क्क्9 साली ही आपली शेवटची निवडणूक असल्याची रावांची भावनिक सादही मतदारराजार्पयत पोहोचली नाही. समीर देसाईंच्या रूपाने आपल्याकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 
मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी जागावाटपात राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या. पैकी तीन जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले. यंदा किमान दोन जागा वाढवून मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका असून मानखुर्द-शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्वची मागणी केली आहे. काँग्रेस मात्र या दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. मानखुर्दमध्ये सपाचे अबू आझमी आणि वांद्रे पूर्व येथून शिवसेनेचे प्रकाश (बाळा) सावंत मागील निवडणुकीत विजयी झाले.