ठाणे : केशरी कार्डधारकांना (एपीएल) शिधावाटप दुकानातून मिळणारे गहू व तांदूळ बंद झाले आहे. तसेच रॉकेलची मोठ्याप्रमाणात कपात केल्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत. या सोईसुविधा पूर्वीप्रमाणे तात्काळ सुरु कराव्या तसेच युती सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिधावाटप, तहसीलदार, प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ३६ फ या शिधावाटप कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने शिधावाटप कार्यालयाचे उपनियंत्रक अशोक मुंढे यांना निवेदन दिले. त्याप्रमाणे अन्न-धान्यपुरवठा मंत्री गिरीष बापट आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदनाची एक प्रत पाठवली आहे. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुभाष मैदानावर मोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन दिली. यावेळी नागरिकही उपस्थित होते.भिवंडीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालीद शेख (गुड्डू), कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, माजी आमदार रशिद ताहीर यांच्या नेतृत्वखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच अंबरनाथ येथील तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले आणि शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. (प्रतिनिधी)
शिधावाटप दुकानांवर राष्ट्रवादीची निदर्शने
By admin | Updated: February 3, 2015 23:12 IST