Join us

समर्थकांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादी नेते गायब

By admin | Updated: January 6, 2015 01:03 IST

शहरात माजी मंत्री गणेश नाईक यांच्या समर्थकांनी लावलेल्या होर्डिंगवरूनही राष्ट्रवादीचे चिन्ह व नेत्यांचे छायाचित्र गायब झाले आहे.

नवी मुंबई : शहरात माजी मंत्री गणेश नाईक यांच्या समर्थकांनी लावलेल्या होर्डिंगवरूनही राष्ट्रवादीचे चिन्ह व नेत्यांचे छायाचित्र गायब झाले आहे. पक्षाचा उल्लेख न करता नाईक समर्थक म्हणूनच शहरवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विष्णुदास भावे नाट्यगृहात ४ डिसेंबरला झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी साहेब घड्याळाची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. राष्ट्रवादीला रामराम करून भाजपामध्ये जाण्याचा आग्रह धरण्यात आला होता. मागील एक महिन्यापासून नाईक परिवाराच्या पक्षांतराची चर्चा जोरात सुरू आहे. परंतु गणेश नाईक किंवा त्यांच्या परिवारातील कोणीही या विषयावर काहीही भाष्य केलेले नाही. कार्यकर्त्यांनाही ठोस काहीही सांगितले नसल्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत. अनेकांनी नवीन वर्षाचे होर्डिंग लावले नाहीत. ज्यांनी होर्डिंग लावले त्यामध्ये राष्ट्रवादीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. नेरूळमध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगवर नाईक समर्थक असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या होर्डिंगवर नाईक परिवारातील सर्वांची छायाचित्रे दिसत आहेत. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे किंवा इतर नेत्यांची छायाचित्रे दिसत नाहीत. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीशी प्रामाणिक असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र होर्डिंगवर शरद पवार यांच्यापासून गणेश नाईकांपर्यंत सर्वांची छायाचित्रे लावली. यामुळे फक्त नाईक परिवाराचे फोटो लावणारे नाईक समर्थक व पक्षाचे फोटो लावणारे पक्षाशी बांधिल कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.(प्रतिनिधी)