Join us  

राज ठाकरेंची काल भुजबळांवर टीका; आज पंकज भुजबळ शिवतीर्थावर दाखल; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:26 PM

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थावर' आज राजकीय नेत्यांची ये-जा; कृपाशंकर सिंह यांच्यानंतर पंकज भुजबळ भेटीला

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंनी काही दिवसांपूर्वीच राज यांची भेट घेतली. त्यानंतर आज कृपाशंकर सिंह राज यांच्या भेटीला पोहोचले. सिंह यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री पंकज भुजबळ शिवतीर्थावर दाखल झाले. या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.

राज यांची ठाण्यात काल जाहीर सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज यांच्या रडारवर होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यावर राज यांनी सडकून टीका केली. 'पंतप्रधान मोदींविरोधात बोलल्यानं मला तरुंगात टाकण्यात आलं. पण तरीही मी माझा ट्रॅक बदलला नाही, असं भुजबळ म्हणाले. तुम्हाला तुरुंगवास मोदींवर टीका केल्यानं नव्हे, तर तुमच्या संस्थेत झालेल्या गैरकारभारांमुळे घडला,' असं राज ठाकरे म्हणाले.

कालच राज यांनी छगन भुजबळांवर टीका केली असताना आज भुजबळ यांचे पुत्र पंकज शिवतीर्थावर दाखल झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंकज भुजबळ सपत्नीक शिवतीर्थावर पोहोचले. राज ठाकरे गेल्याच आठवड्यात आजोबा झाले. राज यांचे पुत्र अमित ठाकरेंना मुलगा झाला. त्याला पाहण्यासाठी पंकज भुजबळ शिवतीर्थावर गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पंकज दोनवेळा राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले आहेत.

टॅग्स :राज ठाकरेपंकज भुजबळछगन भुजबळ