Join us  

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई: भारत-ऑस्ट्रेलिया ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:07 AM

कुरिअरच्या माध्यमातून मुंबईतून ऑस्ट्रेलियाला हा कच्चा माल पाठवला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

मुंबई : एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत भारत-ऑस्ट्रेलिया ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत ९.८७७ किलो एम्फेटामाइन, २.५४८ किलो जोलपिडेम टार्ट्रेट आणि ६.५४५ किलो ट्रामाडोलसह तब्बल ३ कोटी रुपये किंमतीचा अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा हा कच्चा माल भारतातून ऑस्ट्रेलियात पाठवला जात होता. याप्रकरणी तीन कुरिअर कंपनीच्या मालकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी एनसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींना कुरिअर यंत्रणा कशी काम करते याची सखोल माहिती होती. त्यामुळे त्यांनी स्टीलटेबल फर्निचर पॅकेजमध्ये लपवून ठेवलेल्या ड्रग्जची डिलिव्हरी सहा कुरिअरच्या माध्यमातून केली. तसंच त्यांची नावे कधीही समोर येणार नाहीत याचीही काळजी त्यांनी घेतली होती. कुरिअरमधून ऑस्ट्रेलियाला हा कच्चा माल पाठवला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या विश्लेषणानंतर मुंबईतील डीएचएल कुरिअरमध्ये एक पार्सल पकडण्यात आले. हे पार्सल उघडले असता बेवारस स्टीलटेबल फर्निचर आढळून आले. याची कसून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाकिटे लपवून ठेवलेली आढळली आणि या रॅकेटचा भांडाफोड झाला.

महसूल गुप्तचर संचालनालयाकडूनही मोठी कारवाई 

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला अटक केली. सदर महिला अदीस अबाबा येथून फ्लाइट नंबर ईटी-६४० ने मुंबईत आली होती. या महिलेची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

महसूल गुप्तचर संचालनालयाला या विदेशी महिलेकडे तब्बल १ किलो २७३ ग्रॅम कोकिन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत तब्बल १३ कोटी रुपये असल्याचे समजते. 

टॅग्स :मुंबईअमली पदार्थनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो