Join us  

नायर डॉक्टर आत्महत्या; त्रिसदस्यीय समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 6:18 AM

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे.

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे. या घटनेत तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात रॅगिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल.या त्रिसदस्यीय समितीत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महानगरपालिकेच्या महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून हा कायदा अधिक कडक कसा करता येईल याचा अभ्यास तज्ज्ञांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानुसार रॅगिंगच्या कायद्यात कोणत्या प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात याव्या याचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्यात येणार आहे.>प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या!डॉ़ आंबेडकर मेडिकोज् असोसिएशनने शनिवारी कस्तुरबा रुग्णालयात या घटनेचा निषेध नोंदवला़ यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ केईएम, नायर, जे़जे., सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉक्टर या बैठकीला उपस्थित होते़ पीडित तरुणीला अनेक दिवसांपासून त्रास देण्यात येत होता़ विभागाच्या प्रमुखांकडे तिने याची तक्रार केली होती, पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही़ उलट त्रास देणाऱ्यांना प्रोत्साहन दिले़ त्यामुळे तरुणीने आत्महत्या केली़ बारा तासांनंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला़ पोलिसांनी जाणीवपूर्वक ही दिरंगाई केली़ संशयित आरोपींपैकी एकाच्या कुटुंबात वकील सदस्य आहे, तर एकाच्या घरात न्यायाधीश आहे़ त्याचा फायदा घेत गुन्हा नोंदवण्यास उशीर केला, याचा तपास पारदर्शक होण्यासाठी सीआयडीकडे हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी अ‍ॅड़ डॉ़ गुणरत्न सदावर्ते यांनी केली़