Join us  

Nawab Malik: “सरकारला अंधारात ठेवून मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली, मग...” नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 8:34 PM

जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे(Sachin Vaze) आणि परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलियासमोर बॉम्ब प्लँट करुन जे काही केले ते सरकारला अंधारात ठेवून केले गेले. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला तेव्हा देखील मुंबई आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली असा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला आहे.  

नवाब मलिक यांनी सांगितले की, जेव्हा सगळी माहिती समोर आली त्यानंतर आयुक्ताची बदली करण्यात आली. बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरु होईल हे कळल्यानंतर भाजपाच्या मदतीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर काही लोकांनी सीबीआयमार्फत याचा एफआयआर दाखल करुन घेतला. एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी सांगितले.

तसेच तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या. जे काही तुम्ही करत आहात, त्याचे उत्तर आम्ही देऊ. अनिल देशमुखांना अडकविण्यासाठी बनावटपणा करण्यात आला आहे. जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत. आज ना उद्या यातील सत्यता कोर्टाच्या समोर येईल असंही नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

परमबीर सिंग फरार घोषित

मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. गोरेगाव वसुली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. ३० दिवसात परमबीर सिंग हे हजर न झाल्यास त्यांची संपती जप्त केली जाणार आहे. या प्रकरणात परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंग हे तिन्ही फरार घोषित करण्यात आले आहेत. गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना फरार गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :सचिन वाझेनवाब मलिकपरम बीर सिंग